Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत एका विदेशी भारतीय नागरिकाला रिक्षा चालकाने जास्तीचे पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत अशीच घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलेल्या एका नॉन रेसिडेन्शियल इंडियन (एनआरआय) व्यक्तीबरोबर असाच प्रकार घडला आहे. टॅक्सी चालकाने या व्यक्तीला विले पार्ले पर्यंतच्या अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी २,८०० रुपये द्यायला लावण्यात आले आहेत.
सहार पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. डी विजय हे ऑस्ट्रेलियाहून मुंबई विमानतळावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. ऑस्ट्रेलियात रहाणारे आणि मूळ नागपूर येथील विजय यांनी पोलिसांना सांगितले की, विमानतळाबाहेर येताच कॅब चालक विनोद गोस्वामी त्याच्याजवळ आला. तसेच त्याने विजय यांना बनावट अॅप दाखवून फसवणूक केली. विजय यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोस्वामी याला अटक केली आहे.
कॅब चालक सापडला कसा?
विजय हे मुंबई विमानतळावरून गोस्वामींबरोबर गेले. पण विजय यांना टॅक्सीचे पैसे देताना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी उतरलेल्या हॉटेलमध्ये यासंबंधी चौकशी केली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते त्यांच्या पीक अप सेवेसाठी ७०० रुपये घेतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सहार पोलिसांना कॅब चालकाच्या मोबाईल क्रमांकासह ई-मेल पाठवून तक्रार केली.
गोस्वामीने विजय यांना पुढच्या वेळी शहरात आलात तर कॉल करा, असे म्हणून स्वत:चा फोन नंबर दिला होता. या नंबरच्या मदतीने पोलिसांनी गोस्वामीचा १२ तासांच्या आत शोध लावला आणि त्याचे वाहन देखील जप्त केले.
हेही वाचा>> “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
एका अधिकार्याने सांगितले की, त्यांनी विमानतळावर साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत आणि दोन दिवसांत विमानतळावर प्रवाशांकडून जादा शुल्क आकारल्याबद्दल नऊ कॅब चालकांवर कारवाई केली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी सांगलीतील एका १९ वर्षीय तरुणाला जादा भाडे आकारल्याप्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक केली होती. अमेरिकेतून परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तरुणाने रिक्षा भाड्याने घेतली होती.