काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या शो आयोजकांना धमक्या आल्यानंतर देशभरात त्याचे अनेक शो रद्द झाले. यानंतर फारुकीने कॉमेडी शोलाच ‘अलविदा’ केला. मात्र, रविवारी (१९ डिसेंबर) मुंबईत याच मुनव्वर फारुकीचा कॉमेडी शो झाला. हा शो मुंबईतील वाय. बी. चव्हाण ऑडिटोरियमला झाला. हा शो दुसरा तिसरा कुणी नाही तर ऑल इंडिया प्रोफेशनला काँग्रेसने (AIPC) आयोजित केला होता. एआयपीसीचे अध्यक्ष मॅथ्यू अँथनी यांनी याबाबत माहिती दिली. हा शो अगदी शांततेत पार पडला असंही त्यांनी नमूद केलं.
काँग्रेसने हा कार्यक्रम का घेतला?
कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो मुंबईत घेण्यापाठी मागील आपली भूमिका स्पष्ट करत अँथनी म्हणाले, “ज्या व्यक्तींचा संविधान, व्यक्तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निवडीचं स्वातंत्र्य यावर विश्वास आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. आम्ही या शोची घोषणा आधी नाही केली. कारण आम्हाला कुणालाही आव्हान द्यायचं नव्हतं. आम्ही हा शो आयोजित करताना राजकीय ओळख म्हणून निर्णय घेतलेला नाही.”
“आम्हाला मुनव्वर फारुकीला व्यक्ती म्हणून नाही तर राजकीय भूमिका म्हणून पाठिंबा द्यायचा होता. कोणत्याही कलाकाराला विनाभिती व्यक्त होता आलं पाहिजे. लोकशाहीत संतुलन राहण्यासाठी व्यवस्थेची कठोर चिकित्सा झाली पाहिजे. त्यामुळेच आम्ही फारुकीला प्रतिकात्मपणे पाठिंबा दिला,” असंही अँथनी यांनी नमूद केलं.
कॉमेडी शो न करण्याबाबत फारुकी काय म्हणाला होता?
दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ट्वीटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “द्वेष जिंकला आणि कलाकार हरला, माझं झालंय, गुडबाय आणि अन्याय” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. यासोबत त्याने तीन पानांची एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : बजरंग दलाच्या धमकीनंतर मुनव्वर फारुकीचे मुंबईतले दोन कार्यक्रम रद्द
त्यावर तो म्हणाला की, “आज बंगळुरुतील एका शो च्या ठिकाणी तोडफोडीच्या धमक्या मिळाल्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे. मी कधीही न केलेल्या विनोदासाठी मला तुरुंगात टाकले. ज्याचा शो बाबत काहीही संबंध नाही, तो शो रद्द केला जात आहे. हे अन्यायकारक आहे. हा शो कोणत्याही धर्माचा विचार न करता संपूर्ण भारतातील लोकांना आवडला. त्यामुळे हे चुकीचे आहे.” असे त्याने सांगितले.
यापुढे फारुकीने सांगितले की, गेल्या दोन महिन्यात आमचे १२ शो रद्द केले आहेत. या प्रत्येक शो वेळी कार्यक्रमस्थळाची तोडफोड करणे, प्रेक्षकांना त्रास देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांच्या द्वेषाचा एक भाग बनलो आहे. तर काही लोकांना हसवून मी त्यांच्या जगण्याचा आधार बनलो आहे. जर त्या तुटल्या तरच त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. पण खरचं वाटतं मी एक तारा बनलो आहे. पण मला आता वाटतंय की सगळं संपलंय…. गुडबाय.., असे त्याने यात म्हटले आहे. त्यामुळे सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.