राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) विस्तार करण्यात येणार असून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष, प्रबळ राजकीय नेते यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते आणि लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केले.  काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न सुरू असला तरी मनसेच्या समावेशाचा तिढा मात्र अजून कायमच आहे.
काँग्रेस विरोधकांची एकजूट घडविताना राज्यात मनसेला सोडून विचार करणे भाजपला परवडणारे नाही. मतदारसंघातील गणित बिघडवितील आणि निर्णायक विजयापर्यंत पोचवितील, इतके मतदारांचे बळ मनसेच्या सहभागाने एनडीएला मिळू शकते. मनसेला एनडीएसोबत आणण्याची भूमिका मुंडे यांनी याआधीही अनेकदा मांडली आहे. पण उध्दव व राज ठाकरे यांची एकत्र येण्यासाठी अनुकूलता न दाखविल्याने हे गणित अजून अवघडच आहे. यासंदर्भात विचारता मुंडे म्हणाले, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाची युती आहे. त्यात मनसेच्या समावेशाबाबत माझी शिवसेना किंवा मनसे कोणाशीही चर्चा झालेली नाही. हा निर्णय आम्ही घेणार नसून त्या दोघांनी घ्यायचा आहे. मी परस्पर मनसेशी चर्चा करणार नाही.
लोकसभा निवडणुका आठ-दहा महिन्यांवर आल्या असल्याने त्यादृष्टीने भाजपने तयारी करण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व आहे. त्यांना एनडीएकडे वळविण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत. प्रजा समाजवादी पक्षाचे महादेवराव जानकर यांनी शरद पवारांविरोधात निवडणूक लढविली होती. अशा छोटय़ा पक्षांबरोबरच अपक्ष आमदार, लोकसभेसाठी उभे राहिलेले मातब्बर अपक्ष राजकीय नेते यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात एकत्र केले, तर त्याचा लाभ एनडीएला निश्चितच होणार आहे. राज्यात  लहान पक्ष, नेते यांना एनडीएसोबत एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. लोकसभेत त्यांच्या पाठींब्याने एनडीएला विजय मिळविता आला, तर विधानसभेसाठी या पक्ष किंवा नेत्यांना त्या बदल्यात जागा सोडण्याचा विचारही भाजप करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा