आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे की माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी करणार, हा पक्षांतर्गत वाद शिगेला पोचला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाच्या पसंतीचा असावा, हा मुद्दा दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. मुंडे हे खरोखरीच ‘निवडणूक प्रभारी’ आहेत, की केवळ ‘नामधारी प्रभारी’ आहेत आणि गडकरी ‘सर्वाधिकारी’ आहेत, यावर प्रदेशाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडून शिक्कामोर्तब होणार आहे. गडकरींना राज्यातील निर्णयप्रक्रियेत लुडबुड करु न देता त्यांची पुन्हा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दिल्लीत पाठवणी करण्यासाठी मुंडे गट सरसावला असून महाराष्ट्र भाजपमध्ये मुंडेंचा की गडकरींचा शब्द अंतिम असेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
गडकरी व मुंडे यांच्यातील वाद जुनाच असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फेरनिवड होण्याची खात्री असल्याने गडकरी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील निर्णयांचे सर्वाधिकार दिले. मुंडे यांना दिलेले निवडणूक प्रमुखपद तकलादू आहे. आगामी निवडणुका मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा दोन्ही विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी चार-पाच महिन्यांपूर्वी केली होती. पण आता प्रदेशाध्यक्षपदी मुनगंटीवार यांचीच फेरनिवड करण्यास मुंडेंचा विरोध असून त्यांनी तीन वर्षांत कोणती कामगिरी केली असा प्रश्न मुंडे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्या तुलनेत फडणवीस आक्रमक तरूण नेते असून विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष आणि निवडणूक प्रमुख मुंडे यांचे विभाग व जात पाहता, सर्व समीकरणे निवडणुकीसाठी जुळतील, असे मुंडे गटाकडून सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष मुंडे यांच्या पसंतीचा नसेल, तर निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी सुधारणार आणि निर्णयाचे सर्वाधिकार देऊन काय उपयोग, असा मुंडे गटाचा सवाल आहे.
मात्र गडकरी यांनी मुनगंटीवार यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले असून माजी राष्ट्रीय अध्यक्षांना नाराज कसे करायचे, हा पेच राजनाथसिंह यांच्यापुढे आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रवींद्र भुसारी आदींशी शनिवारी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. मुंडे यांना महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सर्वाधिकार देण्याचा निर्णय प्रदेश नेत्यांनी तोंडी जाहीर केला होता. आता नवीन अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्याला कोणताही दुजोरा दिलेला नाही.
मुंडेंकडे ‘निवडणूक प्रमुखपद’ औपचारिकपणे दिलेले नाही. जर निवडणूक काळात त्यांच्या पसंतीचा प्रदेशाध्यक्ष होणार नसेल, तर ते ‘नामधारी प्रभारी’ ठरतील आणि त्यांच्याकडे दिलेले प्रमुखपद किती तकलादू आहे, हे दिसून येईल. त्यामुळे गडकरी यांनी दिल्लीच्या राजकारणात रहावे, यासाठी मुंडे यांच्या गटाच्या हालचाली सुरू आहेत.