१२-१२-१२चे औचित्य साधून राज्यातील दोन दिग्गज नेते शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरे करण्याचे त्यांच्या समर्थकांनी ठरविले होते. पण प्रथम पवार त्यापाठोपाठ मुंडे यांनीही वाढदिवस साजरा करणार नाही, असे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या दिवशी पवार हे नवी दिल्ली, मुंबई अथवा पुणे कोठेही नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी जाहीर केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अलीकडेच झालेले निधन आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे गोपीनाथ मुंडे हे १२ तारखेला वाढदिवस साजरा करणार नाहीत, असे भाजपच्या वतीने कळविण्यात आले आहे. वाढदिवसाच्या दिवशी पवार स्वत: भेटणार नसले तरी गावागावांमध्ये नियोजन केल्याप्रमाणे कार्यक्रम साजरे करण्याचे आवाहन पिचड यांनी केले आहे. मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader