भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून निर्माण झालेला माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील संघर्ष मिटण्याची शक्यता अधिकच धूसर होऊ लागली आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवरच गडकरी यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेतली. दुसरीकडे मुंडे यांचा मुनगंटीवार विरोध प्रखर झाला असून मुनगंटीवार यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमल्यास राज्यातील प्रचारापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याची व निवडणुकीतही सक्रिय न राहण्याची धमकी मुंडे यांनी पक्षनेतृत्वाला दिल्याचे समजते. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा अद्याप रखडली असून, मुंडे यांचा विरोध डावलून मुनगंटीवार यांनी फेरनियुक्ती होण्याची चिन्हे आहेत.
मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला असून मुनगंटीवार यांना जोरदार विरोध केला आहे. या पाश्र्वभूमीवर गडकरी यांनी राजनाथसिंह यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. मुनगंटीवार यांच्याबाबत कोणतेही आक्षेप किंवा आरोप नाहीत. त्यांनी गेल्या तीन वर्षांत संघटनेचे काम सूत्रबध्दपणे केले आहे. त्यामुळे त्यांची फेरनिवड करण्याचा आग्रह गडकरी यांनी धरला आहे. आगामी निवडणुका राज्यात मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला आहे. त्यांच्या पसंतीचा प्रदेशाध्यक्ष न नेमल्यास निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार नाही व प्रचारातही सहभागी होणार नाही, असे मुंडे यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले आहे. त्यामुळे मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष झाल्यास मुंडे यांना बाजूला सारून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची भूमिका गडकरी गटाने पक्षनेतृत्वापुढे मांडली आहे. मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता मुंडे यांना दुखावण्यापेक्षा मध्यम मार्ग काढण्यासाठी राजनाथसिंह संबंधितांशी चर्चा करीत आहेत. पण गडकरी यांची फेरनिवड करण्यासाठी भाजपने केलेली घटनादुरुस्ती मुनगंटीवार यांच्या उपयोगी पडण्याची शक्यता आहे. त्यांचीच फेरनिवड होईल, असे संकेत पक्षनेतृत्वाने दिले असले तरी वाद मिटला नसल्याने औपचारिक घोषणा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा