यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्षभर राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले मारोतराव कन्नमवार हे कोण होते, हे सध्याच्या शासकीय अधिकाऱ्यांना ठाऊकच नसल्याची धक्कादायक बाब सोमवारी विधानसभेत समोर आली.
कन्नमवार यांचे चंद्रपूर जिल्ह्य़ातील स्मारकासाठी आश्वासन देऊनही निधीची तरतूदच न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंगाची सूचना सादर केली. ही फाईल वित्त खात्यात मंजुरीसाठी गेली असता हे कन्नमवार कोण, असा प्रश्न तेथील अधिकाऱ्याने उपस्थित केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगताच सारे सभागृह अवाक झाले.