मुंबई : मुंबई महापालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गावरील डांबरी उंचवट्यांमुळे या रस्त्याची दुर्दशा झाल्याची ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर गुरुवारी दिवसभर फिरत होती. या चित्रफितीची पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेतली असून याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली आहे. मात्र मुंबई किनारी मार्गावर कोणतेही खड्डे नाहीत, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून गेल्यावर्षी मास्टिकचे अतिरिक्त आवरण करण्यात आले होते व त्याचे लवकरच सपाटीकरण करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तब्बल चौदा हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या सागरी किनारा मार्गाची दुर्दशा झाल्याची एक ध्वनीचित्रफित गुरुवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या चित्रफितीतून पालिकेच्या आणि सागरी किनारा मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर टीका करण्यात आली. या चित्रफितीत सागरी किनारा मार्गावर डांबरी पट्टे असल्याचे दिसत आहेत. महागड्या रस्त्यावरील या डांबरी उंचवट्यामुळे (पॅचेस) या मार्गाची प्रतिष्ठाच धुळीस मिळाली असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमावर नागरिक व्यक्त करीत होते. ही ध्वनीचित्रफित दिवसभर फिरत असल्यामुळे पंतप्रधान कार्यालयानेही त्याची दखल घेतली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने समाजमाध्यमावर त्याबाबत स्पष्टीकरण दिले.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पांतर्गत हाजीअली येथे लोटस जेट्टी जवळच्या पुलावर डांबरी पट्टे आहेत. मात्र हे डांबरी पट्टे दिसत असले तरी हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असून या रस्त्यावर कोणतेही तडे वगैरे नाहीत. तसेच, रस्त्यांवर खड्डे देखील नाहीत. सध्या प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात हे मास्टिकचे आवरण टाकण्यात आले होते. मास्टीकच्या आवरणाचे हे उंचवटे लवकरच काढून टाकण्यात येतील व हा रस्ता पूर्णतः सपाट केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई किनारी रस्ताअंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. याचाच अर्थ, अतिरिक्त उपाययोजना म्हणून सप्टेंबर २०२४ मध्ये मास्टिकचे आवरण टाकण्यात आले होते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.