मुंबई : स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवारी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सकाळी ११ ते १ या कालावधीत तब्बल ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सुमारे १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांनी १५३ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा’ जाहीर केला असून त्यात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात व्यापक स्वच्छतेसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासात ‘कचरामुक्त तास’ (गार्बेज फ्री आवर) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या मोहिमेला पालिकेच्या सर्व विभागात एकाच वेळी सुरुवात करण्यात आली. परिमंडळ उप आयुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली विविध रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, वाणिज्यिक क्षेत्र, पर्यटन स्थळे, खाऊ गल्ल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी सामूहिक स्वच्छता करण्यात आली.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संस्था आदींचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य, पोवाडे सादर करण्यात आले. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे.
या स्वच्छता मोहिमेतून अडगळीत साचलेला व दुर्लक्षित कचरा, बांधकाम राडारोडा प्राधान्याने संकलित करण्यात आला. चाळी, झोपडपट्ट्या अशा दाट वस्तीच्या भागांतील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळ स्वच्छ करण्यात आले. बेवारस, भंगार साहित्य आणि सामग्रीची विल्हेवाट लावण्यात आली. रस्ते, दुभाजक, सार्वजनिक भिंतींवरील धूळ, थुंकलेल्या जागांची स्वच्छता करण्यात आली. रस्ते, पदपथ व दुभाजकांवरील अनावश्यक उगवलेली झाडे-झुडुपे काढण्यात आली. सांडपाण्याच्या मार्गिकांमधील कचरादेखील काढण्यात आला, अशी माहिती महानगरपालिका उप आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.