सार्वजनिक, घरगुती उत्सवाबाबत मार्गदर्शक तत्वे; पोलीस, स्थानिक प्रशासन, नेत्यांची एकत्रित बैठक

निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गामुळे चर्चेत असलेल्या धारावीत आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने रूग्णवाढ होऊ नये म्हणून पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी एकत्र येत मूर्तीची खरेदी-विक्री, प्रतिष्ठापना, उत्सवाचे नियोजन आणि विसर्जन या प्रत्येक टप्प्यावर मंडळांनी व घरगुती गणपती आणणाऱ्या कुटुंबांना मार्गदर्शक तत्वे ठरवून देत नवा पायंडा घातला आहे.

धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर या ठिकाणी गणेश आगमन, विसर्जन दणक्यात होते. शिवाय दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात अन्नदान, सांस्कृतिक – सामाजिक कार्यक्रम असे बरेच गर्दीचे उपक्रम सुरु असतात. विसर्जनाला तर रस्त्यावर लाखोंची गर्दी असते. इथल्या उत्सवाचे एकंदर स्वरूप लक्षात घेऊन धारावी आणि शाहूनगरचे  पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी एकत्र येत सार्वजनिक मंडळांची मंगळवारी एक बैठक घेतली. या बैठकीत मंडळांना उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धारावीत जवळपास २०० मंडळ तर १५ ते २० हजार घरगुती गणपती आहेत. त्यामुळे विसर्जनाचे नियोजन हे पालिकेपुढील मोठे आव्हान आहे.

‘करोनामुळे खऱ्या अर्थाने पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे,’ असे आवाहन धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांनी के ले. तसेच धारावीतील मूर्तिकार, मूर्तीविक्रे त्यांनाही काही नियम घालून देण्यात येणार आहेत. येत्या आठवडय़ात सर्व विभागांमध्ये जाऊन मंडळ आणि घरगुती गणपती यांचा समन्वय कसा साधता येईल, याचा आढावा नांगरे घेणार आहेत. याच निर्णयाला शाहूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनीही अनुमोदन दिले. ‘ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्सव रद्द करावे. जे करताहेत त्यांनी शांततेत करावा. धारावीतल पंपिंग मैदान, होळी मैदान, शाहूनगर मैदान अशा काही जागावर कृत्रिम तलाव उभारण्याचा विचार सुरु आहे. धारावीला शीव तलाव आणि माहीम चौपाटी नजीक असल्याने हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. मंडळानी सकारात्मकता दाखवून केवळ दोन माणसांनी विसर्जन स्थळी यावे. तसेच विसर्जनाची आरती घरातून किंवा मंडपातूनच करून मूर्ती विसर्जनस्थळी आणाव्या,’ असे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील गर्दीमुळे बाधितांशी संख्या वाढली तर त्याचा दोष उत्सवाला दिला जाईल. तसे होऊ नये म्हणून त्यावर एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे.  करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा उत्सवाचे स्वरूप बदलायला हवे. मंडळांनी सहकार्य केले तरी गर्दी टाळून उत्सव पार पडता येईल.

– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री.

मार्गदर्शन तत्वे

’  मंडळांनी यंदा वाजंत्री, देखावे, ध्वनीक्षेपक यांचा वापर टाळावा.

’  शक्य तितकी लहान मूर्ती आणावी. जेणेकरून ती मंडपातच विसर्जित करता येईल.

’  आसपास बसणाऱ्या घरगुती गणपतींच्या विसर्जनाचीही जबाबदारी मंडळांनी घ्यावी. शक्य असल्यास विभागात कृतीम तलाव उभारावे.

Story img Loader