१३, १४ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या कालावधीदरम्यान मुंबई अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला असल्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिके ने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
पालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची सहा उदंचन केंद्रे आणि विविध ठिकाणी बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थाही स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे केली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सहा प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहेत. ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक’ (एनडीआरएफ) हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीसाठी तत्पर ठेवण्यात आले आहेत.
शाळांच्या इमारतींत तात्पुरती निवारा केंद्रे
बैठय़ा घरांच्या किंवा झोपडपट्टीच्या परिसरात पाणी साचल्यास त्यांना अन्यत्र हलवण्याकरिता पालिकेच्या ज्या शाळा तात्पुरती निवारा केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, त्या शाळा पालिकेतर्फे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.