मनसेने महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून हिसकावून घेतलेल्या दादरच्या बालेकिल्ल्यात महापालिकेच्याच सफाई कर्मचाऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. भूमिगत गटारापासून रस्त्यावरील सफाईपर्यंत दादर-माहीम ते धारावीपर्यंतचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कामगारांना त्यांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी लागणाऱ्या मास्क, हातमोजे, टोप्या, पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांचे गणवेश, एवढेच नव्हे तर फावडी, बांबूचे खराटे व घमेली आदी साहित्यही वेळेत पुरविण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
एरवी शिवाजी पार्कवर साधे खुट्ट झाले तरी जगाला आग लागल्यासारखे ओरडत सुटणाऱ्या दादरकर समाजसेवकांनाही सफाई कर्मचाऱ्यांच्या वेदना माहीत नाहीत, याचे दु:ख काही सफाई कामगारांनी व्यक्त केले. दादरचा बालेकिल्ला परत मिळविण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेचे नेते सफाई कामगारांना साधी सामग्रीही मिळत नसल्याच्या तक्रारीवर मात्र कोणाला जाब विचारत नाहीत, याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत
आहे.
मनसेचे आमदार नितीन सरदेसाई तसेच दादरमधील सातही नगरसेवक कोणत्या कामात गर्क आहेत, असा सवाल या कामगारांकडूनच उपस्थित करण्यात येत असून दादरमध्येच राहणाऱ्या राज ठाकरे यांना दादरमधीलच परिस्थिती कळत नसेल तर मुंबई आणि महाराष्ट्रात ‘ब्लू प्रिंट’ राबविणार कोणाच्या जीवावर, असा सवाल जी-उत्तर कार्यालयातील घनकचरा विभागाच्या एका अधिकाऱ्याने केला.
या विभागातील ९९ मुकादमांना २०११-१२, १२-१३ व १३-१४ साठी टोपी, कपडे, सेफ्टी शूज देणे बाकी आहे. पुरुष व महिला कामगारांनाही कपडे तसेच ब्लाऊज पीस, टॉवेल, पेटीकोट व साबण आदी देण्यात आलेले नाहीत. गटारात उतरून काम करणारे तसेच सफाई करणाऱ्या कामगारांसाठीचे ९८ हजार मास्क देण्यात आलेले नाहीत. दोन वर्षांतून एकदा गमबूट देण्यात येतात. पुरुष व महिलांसाठी मिळून १८९६ गमबूट दिलेले नसल्याचे पालिकेच्या २७ जुलैच्या अहवालातच नमूद केले आहे. महिला कर्मचाऱ्यांना द्यावयाचे ब्लाऊज पीसचे ५०३ जोड देण्यात आले नसल्याचे घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Story img Loader