लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दादरमधील प्लाझा चित्रपटगृहाबाहेरील परिसरात प्रचंड वर्दळ, भाजीवाले – फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते, सकाळच्या वेळी भाज्यांची होणारी आवक-जावक, भाजी विक्रेत्यांचा कलकलाट आणि त्यानंतर भाजीच्या कचऱ्यामुळे दिवसभर चिखलमय होणारा रस्ता… हे चित्र बदलण्याचा संकल्प पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाने केला आहे. ‘जी उत्तर’ विभागाने प्लाझा परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. पालेभाज्यांमुळे चिखलमय झालेल्या रस्त्याच्या साफसफाईत भाजी विक्रेत्यांनाही सहभागी करून घेण्यात आले व त्यांना स्वच्छतेविषयी जाणीव व जागरूक करण्याची अनोखी मोहीम राबविण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘जी उत्तर’ विभागाने दादरच्या प्लाझा परिसरात मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली होती. दादर स्थानक परिसर भाजी आणि फूल विक्रेत्यांसाठी मोठा बाजार आहे. दररोज पहाटे या ठिकाणी मुंबई बाहेरून मोठ्या प्रमाणावर घाऊक प्रमाणावर भाजी आणि फूले आणली जातात. लहान व्यापारी ते विकत घेतात आणि ठिकठिकाणी नेऊन विकतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून त्याचा ताण दादर परिसरावर येऊ लागला आहे. भाज्यांच्या गोण्या उतरवताना पडणाऱ्या भाज्या, माती यामुळे स्थानकाजवळचे रस्ते विशेषतः प्लाझा येथे टिळक पुलावरील पदपथावर चिखलाचे जाड थर साचतात. यावरून अनेकदा घसरून पडण्याचा धोकाही पादचाऱ्यांना असतो. यावर उपाय म्हणून पालिकेने आतापर्यंत अनेकदा स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच कचरा, चिखल साचतो. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी एक वेगळीच मोहीम हाती घेतली.

आणखी वाचा-धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक अन् नियोजकांचा सहभाग; धारावी मास्टर प्लॅनची संकल्पना सादर करणार

दररोज सतत रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम केले जाते. मात्र दादर परिसरातील कचऱ्याचे प्रमाण प्रचंड आहे. ते कमी करण्यासाठी फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही प्लाझा चित्रपटगृहाच्या आसपासच्या परिसरातील भाजी विक्रेत्यांना स्वच्छता मोहीमेत सहभागी करून घेतले. स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यामुळे त्यांनाही आपण किती कचरा करतो याची जाणीव झाली. भाजी उतरवताना ताडपत्री ठेवावी, गोणी अंथरावी. त्यामुळे रस्त्यावर चिखल होणार नाही, अशी सूचना भाजी व्यावसायिकांना करण्यात आली आहे, असे ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयातील घनकचरा विभागातील अधिकारी इरफान काझी यांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राबवलेल्या या मोहिमेत सर्व फेरीवाले सहभागी झाले होते. कनिष्ठ पर्यवेक्षक सुनील मकवाना, मुकादम सुनील कांबळे आणि स्वच्छता दूतही सहभागी झाले होते. यावेळी ब्रशच्या सहाय्याने रस्ते घासून, मग पाण्याच्या फवाऱ्याने रस्ता धुण्यात आला. यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने ही साफसफाई करण्यात आली.