मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावल्याचे निदर्शनास आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने रस्त्यावर चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, मुंबईत रस्त्यावर चर खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वगळता नवीन चर खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई शहर व उपनगरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेतर्फे मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने वायू प्रदुषणाला कारणीभूत ठरणाऱ्या छोट्या-मोठ्या घटकांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने मुंबईत विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एकूण ४५ वायू गुणवत्ता संनियंत्रण यंत्रे स्थापन केली आहेत. या यंत्रांद्वारे वास्तविक – वेळेतील हवेची गुणवत्ता मोजली जाते. महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंघपणे कार्यवाही सुरू केली असून त्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालयांचा समावेश आहे. तसेच, वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींवर महापालिका अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, रस्त्यावर नव्याने चर खणण्यास महापालिकेने मनाई केली असून केवळ जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामास मुभा दिली जाणार आहे.
हेही वाचा…शिवडीतील पाणीपुरवठा पूर्ववत, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण
चर खोदण्याच्या कामामुळे वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या कारणास्तव धूळ प्रतिबंध कार्यवाहीसाठी चर खोदकामास मनाई करण्याचे आदेश भूषण गगराणी यांनी सर्व प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त, रस्ते व वाहतूक विभागाचे उप प्रमुख अभियंता यांना दिले आहेत. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल.