मुंबई : मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, अडथळाविरहित वावरता येईल अशी जागा आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, इंटरनेट, सर्व्हर, संगणकीय यंत्रणा सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी, कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी टोकन प्रणाली राबवावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
भूषण गगराणी यांनी शुक्रवारी वरळी, प्रभादेवीचा समावेश असलेल्या जी दक्षिण विभाग कार्यालयाला भेट देऊन नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. या नागरी सुविधा केंद्रात नागरिकांसाठी प्रथमच टोकन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. तसेच नागरिकांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे गार पाणी, प्रतिसाद पेटी आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सेवा सुविधांची गगराणी यांनी प्रशंसा केली. तसेच, नागरी सुविधा केंद्रात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी आलेल्या नवदाम्पत्याला गगराणी यांच्या हस्ते फूल आणि स्वागतपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा…जे जे रुग्णालयाचे दोन वर्षांत १०० टक्के नूतनीकरण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
गगराणी यावेळी म्हणाले की, प्रत्येक विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात नागरिक विविध दाखले – कागदपत्रांसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी असते. दोन ते तीन तास रांगेत थांबल्यानंतरही क्रमांक येईल का, याची शाश्वती नसते. कामासाठी भरपूर वेळ खर्च होतो. प्रसंगी वादावादीचे प्रकारही घडत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरी सुविधा केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन, नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी नियोजन केले पाहिजे. सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून नागरी सुविधा केंद्रांची रचना केली पाहिजे. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी प्रशिक्षित, तंत्रस्नेही आणि सौजन्यशील आहेत, याची खातरजमा केली पाहिजे. परिमंडळ उप आयुक्तांनी आणि सहायक आयुक्तांनी नागरी सुविधा केंद्राला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, नागरिकांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करावे, असे निर्देशदेखील भूषण गगराणी यांनी दिले.