मुंबई : महानगरपालिकेतर्फे वांद्रे पश्चिम येथे सागरी सेतूनजीक मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रक्रिया केंद्राच्या प्रगतीची महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी पाहणी केली. प्रतिदिन सुमारे ३६० दशलक्ष लीटर क्षमतेच्या या प्रकल्पाची सुरुवातीची संरचनाविषयक कामे पूर्ण झाली असून आता उर्वरित कामांना वेग देण्यात आला आहे. तसेच, हे मलजल प्रक्रिया केंद्र जुलै २०२७ पर्यंत कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम कंत्राटदार मे. लार्सेन अँड टुब्रो लि. यांना ३१ मे २०२२ रोजी देण्यात आले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी बांधकाम करण्याचे काम ५ जुलै २०२२ पासून सुरू करण्यात आले. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी ५ वर्षे इतका आहे. तसेच २०२७ पर्यंत प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होतील, या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स आयव्हीएल इंडिया एन्व्हायर्नमेंटल आर अँड डी प्रा. लि. जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पस्थळी गगराणी शनिवारी भेट दिली. दरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या प्रतिकृतीची (मॉडेल) पाहणी केली.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिमतः कसे असेल, त्याची आभासी प्रतिमा (व्हर्च्युअल मॉडेल) देखील त्यांनी ‘व्हर्च्युअल रिऍलिटी ग्लासेस’द्वारे पाहिली. त्यानंतर संगणकीय सादरीकरणातून माहिती सादर करण्यात आली. प्रकल्पस्थळी बांधकामाच्या प्रगतीची तसेच सागरी पातमुख (आऊटफॉल), बांधकामाला लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्याकरिता नुकताच उभारण्यात येत असलेला प्रतिदिन २५० किलो लीटर क्षमतेचा मलजल प्रक्रिया केंद्र आणि कामगारांचे शिबीर याचाही गगराणी यांनी आढावा घेतला. प्रकल्पाची प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील कामांना आणखी वेग द्यावा, अशी सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केली. जागेची मर्यादा असली तरी प्रकल्पातून निघणारा गाळ अन्यत्र नेवून त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी प्रकल्पस्थळीच प्रक्रिया करुन त्यातून खतनिर्मिती करता येईल का याची चाचपणी करावी. त्यासाठी खतनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या, संस्था, तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधावा. कमी जागेत साध्य अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. प्रकल्पस्थळी गाळ प्रक्रिया होवू शकली, तर वाहतूक व अन्य खर्चांमध्ये, वेळेमध्ये बचत होवू शकेल तसेच प्रशासनाच्या दृष्टिने ते सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पाची स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील, अशारितीने नियोजन करण्यात आल्याने हा प्रकल्प ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होईल. या प्रकल्पाचा प्रचालन व परिरक्षण कालावधी १५ वर्षे आहे, असे उपआयुक्त शशांक भोरे यांनी सांगितले. तर, या प्रकल्पाची भौतिक प्रगती २१ टक्के झाली आहे. स्थापत्य कामांनी पकडलेला वेग लक्षात घेता संयंत्रांची मागणी, खरेदी या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकल्पस्थळी असणारी सुमारे २६५ झाडे मालाड, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुनर्रोपित करण्यात आली आहेत,असे प्रमुख अभियंता राजेश ताम्हाणे यांनी सांगितले.

हा प्रकल्प सुमारे ८.३६ हेक्टर एवढ्या उपलब्ध मर्यादीत जागेत बांधण्यात येत आहे. प्रकल्पात गाळ प्रक्रिया, प्रक्रियेअंती तयार होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मिती त्याचप्रमाणे नॉलेज सेंटर व व्हीविंग गॅलरीचा देखील समावेश आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच माहीम, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी), खेरवाडी आणि सांताक्रूझ परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे, अशी माहिती उप प्रमुख अभियंता राजेंद्र परब यांनी दिली.

Story img Loader