लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वर्षोनुवर्ष कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीची नोटीस दिलेल्या मालमत्तेवर महानगरपालिका तरतुदीनुसार कलम २०५ नुसार जप्ती व अटकावणी करावी. मालमत्ताकराची वसुली न झाल्यास जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करण्याच्या प्रक्रियेस वेग द्यावा, त्यानंतर मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी दिले. दरम्यान, करवाढीचा नवीन स्रोत शोधण्याकरीता २४ विभागातील मालमत्तांचे स्थळनिरीक्षण करून त्यातील बदलानुसार करनिर्धारणात सुधारणा करावी, असेही गगराणी यांनी सांगितले.
मालमत्ता कर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. मालमत्ता कर नागरिकांनी वेळेत पालिकेकडे जमा करावा, यासाठी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन खात्यामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. करनिर्धारण व संकलन विभागातर्फे २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी अखेरीस संबंधितांना पाठविण्यात आली असून २५ मेपर्यंत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. करसंकलनाचे २०२३ -२४ चे निर्धारित उद्दिष्ट ४ हजार ५०० कोटी रूपयांचे असून ९ मेपर्यंत ३ हजार ९०५ कोटी रूपयांचे कर संकलन झाले आहे. उर्वरित १५ दिवसात ५९५ कोटी रूपयांचा मालमत्ताकर संकलनाचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.
आणखी वाचा-ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास: रहिवाशांच्या अनुपस्थितीमुळे सोडत रद्द
मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करावे. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी आणखी परिश्रम घेण्यात यावे. असे गगराणी यांनी बैठकीत सांगितले. यावेळी अश्विनी जोशी, सहआयुक्त सुनील धामणे, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, सहायक आयुक्त महेश पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
तीन मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई
सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर महानगरपालिकेतर्फे जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील २ भूखंड आणि ‘एफ उत्तर’ विभागातील एका भूखंडाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ६ कोटी ७३ लाख २० हजार ९३१ हजार रुपयांची कर थकबाकी आहे.
आणखी वाचा-मुंबई : सर्व्हर डाऊन झाल्याने सीईटी परीक्षेत गोंधळ
पी उत्तर विभागात कुरार गावातील मालाड येथील एसजीएफ एंटरप्रायजेस (३ कोटी ११ लाख ५८ हजार ९८९ रुपये), मालाड येथील राणी सती मार्ग येथील राधा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (२ कोटी ५४ लाख ५ हजार ७३७ रुपये) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर, एफ उत्तर विभागातील वडाळा येथील कपूर मोटर्स यांच्या व्यावसायिक भूखंडावर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे एकूण १ कोटी ७ लाख ५६ हजार २०५ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल.