मुंबई : पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन करावे, पावसाळापूर्व कामांची योग्य अंमलबजावणी करावी, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरे करावेत असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून यावेळी फेब्रुवारी महिन्यातच पालिका आयुक्तांनी आढावा बैैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी सखल परिसरांमध्ये रेल्वे रूळांवर पाणी साचते. अशावेळी संपूर्ण रेल्वेसेवा बाधित होते. रेल्वे सेवा ठप्प झाली की संपूर्ण मुंबई ठप्प होते. लाखो प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडतात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. अशी परिस्थिती पुढील पावसाळ्यात उद््भवू नये म्हणून सतर्क राहण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगरपालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. त्यावेळी भूषण गगराणी यांनी वरील निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांच्यासह रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मागील काही वर्षात ज्या ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणांचा स्थळनिहाय आढावा घेऊन कोणती कार्यवाही केली, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रेल्वेलगतच्या नाल्यातून गाळ काढण्याची कामे योग्यरितीने आणि पूर्ण क्षमतेने करावी, पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीसाठी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी दौरे करावेत, असे निर्देश गगराणी यांनी दिले. मध्य रेल्वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्वे स्थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळक नगर नाला, विद्याविहार रेल्वे स्थानक (फातिमा नगर), कर्वे नगर नाला (कांजूर मार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्वे स्थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक १), तसेच, पश्चिम रेल्वे विभागातील अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत यावेळी विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.

रेल्वे परिसरातील कलव्हर्टची स्वच्छता मोहीम संयुक्तपणे पूर्ण करावी. ही कामे विहित वेळेत पूर्ण करून पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल, अशा तऱ्हेने उपाययोजना कराव्यात. जोरदार पावसातही उपनगरीय रेल्वे सेवा विनाव्यत्यय सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी नाल्यांमधून गाळ उपसा करण्यासह इतरही कामे योग्यरितीने पार पडावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करावी. ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचण होणार नाही, नाले परिसरातील रहिवासी भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. मुंबईत सखलभागात पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी उदंचन (पंप) व्यवस्था करण्यात येणार आहे. पंप चालक आणि अभियंत्यांनी हे पंप वेळेत सुरू होतील याची खबरदारी घ्यावी. काही ठिकाणी रेल्वे विभागामार्फत कामे सुरू असून ती विहित वेळेत पूर्ण करावीत. या कामांसाठी महानगरपालिका रेल्वे विभागास निधी उपलब्ध करून देणार असेल तर हा निधी विनाविलंब उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनादेखील बांगर यांनी केली.

Story img Loader