मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेची मोहीम; टाळाटाळ केल्यास वाहन, मौल्यवान वस्तू जप्त

प्रसाद रावकर

मुंबई : उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई महापालिकेने  आता मोठय़ा थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोटय़वधी रुपयांचा कर थकविणाऱ्या तब्बल २०० हून अधिक थकबाकीदारांवर करनिर्धारण आणि संकलन विभागाने नोटीस बजावली आहे. महिना अखेरीपर्यंत थकीत कर न भरणाऱ्यांची आलिशान वाहने, महागडय़ा वस्तू जप्त करण्याची, तसेच कार्यालयाला टाळे ठोकण्याची तयारी सुरू पालिका करीत आहे.  काही वर्षांपूर्वी जकात कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. परंतु देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर जकात कर बंद करण्यात आला. जकातीबरोबरच मोठा महसूल मिळवून देणारा मालमत्ता कर आता पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. मात्र करोनाकाळात नागरिकांची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे कर वसुलीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत मुंबईत सरासरी ६९ टक्के कर वसुली झाली आहे.

चालू आर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता करापोटी सात हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज पालिका आयुक्तांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. मात्र करोना काळात नागरिकांचे बिघडलेले गणित, भांडवली मूल्यामधील सुधारणांना झालेला विरोध, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना केलेली करमाफी लक्षात घेऊन मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित उत्पन्न सात हजार कोटी रुपयांवरुन ४,८०० कोटी रुपये असे सुधारित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. मात्र हे उद्दिष्ट्ही गाठणे पालिकेला जमलेले नाही. आता करनिर्धारण व संकलन विभागाने मार्चअखेपर्यंत मोठय़ा प्रमाणावर कर वसूल करण्याचा निर्धार केला आहे.

मालमत्ता करापोटी तब्बल २,२९४.९५ कोटी रुपये थकविणाऱ्या २०० जणांची यादी करनिर्धारण व संकलन विभागाने तयार केली आहे. त्याव्यतिरिक्त आघाडीच्या १० थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.  पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील थकबाकी वसूल करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल २०० हून अधिक थकबाकीदारांवर नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये विकासक, बडय़ा कंपन्या, मोठी रुग्णालये, मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आदींचा समावेश आहे. या सर्वावर बजावलेल्या नोटीसची मुदत फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस जप्ती आणि अटकावणीच्या कारवाईला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.  नोटिसा मिळूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदाराची आलिशान वाहने, महागडय़ा वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. तसेच कार्यालयाचा काही भाग वा संपूर्ण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा विचार सुरू आहे.

पूर्व उपनगरांत सर्वाधिक वसुली

चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी सहा हजार कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ४,१४५ कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ६९ टक्के कर वसूल करण्यात आला आहे. शहर आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत पूर्व उपनगरात सर्वाधिक करवसुली झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये ७३टक्के , शहरात ६९टक्के , तर पश्चिम उपनगरात ६८ टक्के कर वसूल झाला आहे. तसेच पालिकेच्या ए (८१ टक्के), एफ दक्षिण (८४ टक्के), आर मध्य (८१ टक्के), आर उत्तर (८४ टक्के), एम पूर्व (७९ टक्के) आणि एस (७७ टक्के) विभाग कार्यालयांच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणावर कर वसूल करण्यात आला आहे. मात्र बी (५९ टक्के) आणि एच पूर्व (६० टक्के) भागात फारशी कर वसुली होऊ शकलेली नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर कर वसुलीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. करोना आणि पालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन थोडी आधीच कर वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली.  गतवर्षांच्या तुलनेत यंदा कर वसुली अधिक आहे. आतापर्यंत मालमत्ता करापोटी साधारण ४,५०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, करनिर्णारण व संकलन

Story img Loader