मुंबई : महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाच्या हद्दीतील मढ आयलॅण्ड परिसरातील दारणे हाऊस (ख्रिश्चन पाडा) येथे अनधिकृतरित्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत अनधिकृत इमारतीच्या तळ मजल्यासह वरील तीन मजले जमीनदोस्त करण्यात आले.
उप आयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी १० कामगार, १० पोलीस, अभियंता, सहायक अभियंते तैनात करण्यात आले होते. तसेच कारवाईत इमारत आणि कारखाना विभागाच्या कर्मचारी सहभागी झाले होते. हे ठिकाण दाट लोकवस्तीचे असल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना कोणताही धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन ही कारवाई करण्यात आली.