मुंबई : मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत कुर्ला, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडेतीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली.
मुंबईतील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, झाडांची पडझड कशी रोखावी आदी विविध विषयांवर उहापोह करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आदींची महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. मुंबईतील पुरातन वृक्षांच्या संगोपनासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्याचबरोबर वृक्षलागवड वाढवण्यासाठीही पालिका प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, तसेच पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी आरक्षित असलेल्या तब्बल चार एकर भूखंडावर साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच, महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार अाहे, असे गगराणी यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>INS ब्रह्मपुत्रा जहाजाला लागलेल्या भीषण आगीत एक खलाशी बेपत्ता; युद्धनौकाही एका बाजूला झुकली!
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त किशोर गांधी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी, पार्ले वृक्ष मित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, वातावरण फाउंडेशनचे भगवान केसभट आदी विविध पर्यावरणविषयक संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित होते.