मुंबई : न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली असून गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व्हावा यासाठी मूर्तिकारांना मागतील तेवढी शाडूची माती उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या सात परिमंडळांना तूर्तास प्रत्येकी १०० टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार असून मूर्तिकारांना १ मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मूर्तिकारांना शाडूची माती कमी पडू द्यायची नाही, असा निर्धार महापालिकेने केला आहे.
मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाचे आदेश आणि ‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन मुंबईतील गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व्हावा या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सात परिमंडळांना विभागस्तरावर निविदा मागवून शाडूची माती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तूर्तास प्रत्येक परिमंडळाला १०० टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येईल. मात्र मागणी वाढल्यास आणखी शाडूची माती खरेदी करून मूर्तिकारांना देण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पीओपीसंदर्भातील उच्च न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून मूर्तिकारांना विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करण्यात येत आहे. मूर्तिकारांच्या मागणीनुसार त्यांना १ मार्चपासून शाडूची माती देण्यात येईल.–प्रशांत सकपाळे, उपायुक्त