लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील गौतम नगर परिसरात होऊ घातलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या ‘आश्रय आवास’ योजनेत ३१ अनधिकृत बांधकामे अडथळा बनली होती. मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवत ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे ‘आश्रय आवास’ योजनेच्या अंमलबजावणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गौतम नगर येथे ‘आश्रय आवास’ योजनेअंतर्गत नवी घरे बांधण्याच्या प्रकल्पात ३१ अनधिकृत बांधकामांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील अनधिकृत बांधकामांमुळे योजनेच्या अंमलबजावणीला वेग मिळत नव्हता. परंतु ‘एफ-दक्षिण’ विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. परिणामी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत घरे मिळणार आहेत.

आणखी वाचा-केईएम रुग्णालयात रक्ततपासणीसाठी गर्भवती महिला तासन तास तिष्ठत

मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार आणि ‘एफ-दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘एफ-दक्षिण’ विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून तब्बल १३० मनुष्यबळ आणि त्यांच्या मदतीला ३ जेसीबी, २ डंपर, २ वाहने यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईच्या वेळी पोलीस दलातील ९५ अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation hammers on unauthorized constructions that become hindrance in ashray awas scheme for employees mumbai print news mrj