मुंबई : महापालिकेने राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी दहिसर आणि शीळ फाटा येथे प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र, मुंबईत प्रतिदिन निर्माण होणाऱ्या सुमारे ८ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये नाही. त्यामुळे या प्रकल्पांची प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्याचा विचार महापालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे.
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प, बांधकामे सुरू आहेत. या कामांमुळे, तसेच रस्त्यांवरील धूळ, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर आदी विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांत हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनतर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध उपाययोजना आणि वातावरणीय बदलांनंतर आता हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, मुंबईत सुरू असलेले पुनर्विकास प्रकल्प, विकासकामे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्यस्थितीत मुंबईत सुमारे ६५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान पालिका पेलवत असतानाच मुंबईत आता बांधकामाचाही कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागला आहे. राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने दहिसर आणि शीळ फाटा येथे प्रत्येकी प्रतिदिन ६०० मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत या प्रकल्पांत सुमारे २७ हजार मेट्रिक टनाहून अधिक राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात पालिकेला यश आले आहे. प्रक्रिया केलेल्या राडारोड्यातून वाळूसदृश्य घटकांपासून पेव्हर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) आदींची निर्मिती केली जात आहे.
सध्यस्थितीत मुंबईत प्रतिदिन सुमारे ८ हजार मेट्रिक टन राडारोडा निर्माण होऊ लागला असून पालिकेकडे केवळ १२०० मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा आहे. प्रतिदिन जमा होणारा राडारोडा आणि प्रकल्पांची एकूण क्षमता यात मोठी तफावत असल्याने भविष्यात राडारोड्याची समस्या जटील होण्याची शक्यता आहे. राडारोड्यामुळे होणारे हवा प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता पालिकेने या दोन्ही प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. पालिका प्रशासन स्तरावर याबाबत विचार सुरू असून लवकरच या प्रकल्पांची क्षमता वाढण्याची शक्यता आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.