मुंबई : मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांवर दहनसंस्कार करण्यासाठी देवनार पशुवधगृहात प्राण्यांची दहनवाहिनी उभारण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. संबंधित दहनवाहिनीचे काम अंतिम टप्य्यात आले असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. महिनाभरात ही सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे. या दहनवाहिनीमुळे पूर्व उपनगरातील मृत भटक्या, तसेच पाळीव प्राण्यांवर दहनविधी करणे सोपे होणार आहे. त्याचसोबत देवनार पशुवधगृहातील अन्य काही कामे प्रगतीपथावर आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने मालाड येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांवर दहनसंस्कार करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित दहनवाहिनी सुरू केली. प्राण्यांच्या या दहनवाहिनीला नागरिक आणि प्राणीप्रेमींचा प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात घेऊन देवनार पशुवधगृहातही दहनवाहिनीची सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेने निर्णय घेतला. त्यानुसार देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाचा ‘टप्पा – १ अ’मधील कामे पूर्ण झाली असून ‘टप्पा १ ब’मधील कामे प्रगतीपथावर आहेत. याअंतर्गत पालिकेने पशुवधगृहात विविध कामे हाती घेतली आहेत. मालाड येथील दहनवाहिनीत शहर आणि पश्चिम उपनगरांतील अनेक प्राण्यांचा दहनविधी करण्यात येतो. मात्र, पूर्व उपनगरतील प्राणीप्रेमींची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र, तरीही अनेकजण प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी मालाडमध्ये जाऊन दहनविधी करतात. काही तांत्रिक अडचणींमुळे देवनारमधील दहनवाहिनीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र, आता लवकरच दहनवाहिनी सुरू होणार आहे. या दहनवाहिनीची ५० किलो क्षमता असून एकाच वेळी १० ते १२ किलो वजनाच्या पाच प्रण्यांवर दहनविधी करता येणार आहे. ही दहन व्यवस्था पर्यावरण पूरक म्हणजेच पीएनजीवर आधारित असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
देवनार पशुवधगृहात दहनवाहिनी उभारण्यासोबतच अन्य कामेही सुरू आहेत. पशुवधगृहातील प्रशासकीय इमारत व शेळ्या, मेंढ्यांच्या कत्तलखान्याच्या इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच, येथील गुराढोरांचा गोठा व पंपरूम आणि एस – १ वाड्याचीही संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येत आहे. ही सर्वच कामे पुढील महिन्यापर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने कामांना वेग देण्यात आला आहे. या कामांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १३.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.