वरळीतील सुखदा- शुभदा गृहनिर्माण सोसायटीतील गाळे सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यालय, व्यायामशाळासारख्या नियमबाह्य वापरासाठी बळकावल्याचे उघड झाल्यानंतर महानगरपालिकेने नोटिस बजावली़  परंतु, केवळ भाजप नेते गोपीनाथ मुंडे वगळता इतर सर्व नेत्यांनी पालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता ही सर्व अवैध कार्यालये, दुकाने बंद करण्याचा आदेश देत मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मूळात पोलिसांच्या वरळीतील जमिनीवर राजकारण्यांची सुखदा- शुभदा गृहनिर्माण सोसायटी उभी राहिली. ती बांधताना किराणा दुकान, दूध डेअरी यासारख्या दैनंदिन वस्तूंच्या दुकानांसाठी गाळे बांधण्याची परवानगी मागण्यात आली. ती मिळाल्यानंतर गाळे बांधले गेले. पण या लोकोपयोगी दुकानांऐवजी सर्वपक्षीय नेत्यांनी हे गाळे आपले कार्यालय, जिम, दुकान थाटण्यासाठी ताब्यात घेतले. अमित मारू यांनी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या कागदपत्रांत गाळय़ांवर असा नियमबाह्य वापर करणाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून त्यांचे कट्टर स्पर्धक भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे, वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर, रणजित देशमुख आदी दिग्गज नेत्यांची नावे समोर आली. यानंतर महापालिकेने त्यांना गाळय़ांतील ही कार्यालये आणि इतर नियमबाह्य गोष्टी बंद करण्याची नोटिस पाठवली.
मात्र, केवळ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पालिकेच्या पत्राला प्रतिसाद देत आपले कार्यालय बंद केले. बाकीच्या नेत्यांनी त्या नोटिशीला थेट कचऱ्याची टोपली दाखवली. अमित मारू यांनी अॅड. आभा सिंग यांच्यासह या प्रकरणात पाठपुरावा सुरू ठेवला. आधीच्या पत्राला प्रतिसाद न दिल्याने आता पालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून गाळय़ांमधील हे सारे उपक्रम बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच पालिका अधिकाऱ्यांनाही याबाबत आदेश देत कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता बांधकामांवर पालिका कारवाईचा हातोडा मारणार काय की दबावापुढे हा आदेश केवळ कागदाचे चिटोरे ठरणार याबाबत उत्सुकता असणार आहे.

Story img Loader