अंधेरीमधील धोकादायक गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी पुढील काही महिाने ह पूल पादचारी, दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. पुलाच्या दोन मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवता येतील का यादृष्टीने त्याची संरचनात्मक तपासणी करण्याची विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांना पाठविले आहे.

हेही वाचा >>>“ते गळे काढणार…मुंबई आमची, मुंबई आमची…, तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची”

अंधेरीमधील गोखले पूल गेल्या आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पुलाचे संपूर्ण बांधकाम करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने दर्शविली असून त्यानुसार महानगरपालिकेचा पूल विभाग कामाला लागला आहे. महानगरपालिकेने पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी निविदा मागवल्या आहेत. तर रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा धोकादायक भाग पडण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र हा पूल पुढचे काही दिवस हलकी वाहने, पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग व जुना पूल धोकादायक झाला असून तो तत्काळ पाडून टाकावा असा अहवाल महानगरपालिकेच्या सल्लागाराने नियमित तपासणीनंतर दिला होता.

हेही वाचा >>>शहरी नक्षलवाद प्रकरण : दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याने प्रा.आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

त्यानंतर युद्धपातळीवर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. गेल्या रविवारी यात अधिकच भर पडली. त्यामुळे हा पूल पादचारी, दुचाकी, रिक्षा अशा हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता महानगरपालिका व्हीजेटीआय आणि आयआयटी या संस्थांची मदत घेणार आहे. महानगरपालिकेने नुकतेच या दोन संस्थाना पत्र पाठवून पुलाची संरचनात्मक तपासणी करण्याबाबत विचारणा केली आहे.टप्प्याटप्प्याने पुलाचे पाडकाम करून नवीन पूल तयार करण्यासाठी महानगरपालिकेने मे २०२३ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र तरीही दोन मार्गिका ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू ठेवता येतील का, त्याकरिता काही उपाययोजना करता येतील का याबाबतही या दोन संस्थांकडून महानगरपालिकेने सल्ला मागितला आहे.

Story img Loader