लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: नालेसफाई पाहणी दौऱ्यादरम्यान मिलन सब-वे जवळील नाला अस्वच्छ असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशांचे पालन करीत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पर्जन्य जलवाहिनी विभागातील दोन दुय्यम अभियंते आणि एका सहाय्यक अभियंत्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईमधील सखलभाग जलमय होऊ नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी १८ आणि १९ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान मिलन सब-वेजवळील एका मोठ्या नाल्याची मुख्यमंत्रांनी पाहणी केली. या नाल्यामध्ये गाळ आणि तरंगता कचरा आढळून आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
हेही वाचा… अबू सालेमचा भाचा मुंबईत फूटपाथवर चहा पित होता, तेवढ्यात उत्तर प्रदेश पोलिसांचं पथक आलं अन्…
मुख्यमंत्र्यांचे आदेश लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने याप्रकरणी एच-पश्चिम विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी पर्जन्य जलवाहिनी विभागातील दोन दुय्यम अभियंता आणि एका सहाय्यक अभियंत्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुय्यम अभियंता परेश खटर आणि रमेश गिरगावकर, सहाय्यक अभियंता तुषार पाटील यांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा… ‘कान’ हा फॅशनचा नाही, चित्रपटांचा महोत्सव – रिचा चढ्ढा
नालेसफाईबाबत स्पष्ट सूचना देऊनही कंत्राटदाराकडून नाल्याच्या सफाईचे काम योग्य पद्धतीने करून घेण्यात आलेले नाही. नालेसफाईच्या कामातील दुर्लक्ष, हलगर्जीपणा आणि दिलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात दोन दिवसांमध्ये स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. नियोजित वेळेत आपल्या अखत्यारितील नालेसफाईची कामे पूर्ण न झाल्यास, त्याबाबत तक्रारी आल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.