लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील मुंबई महानगरपालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावाला लागून असलेल्या प्राणी संग्रहालयाला मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. येथील १,६५५ चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.
शिवाजी पार्क येथील महानगरपालिकेच्या ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात गेल्या आठवड्यात मंगळवारी पहाटे मगरीचे पिल्लू आढळले होते. हे मगरीचे पिल्लू बाजूच्या प्राणी संग्रहायलयातून आल्याचे आढळले होते. मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासल्यानंतर ही बाब उघड झाली. आता महानगरपालिका प्रशासनाने प्राणी संग्रहालयावर नोटीस बजावली आहे.
आणखी वाचा-सणासुदीच्या काळातील नव्या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी वेळेत अर्ज करा
प्राणी संग्रहालयात करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमांतर्गत (एमआरटीपी) ही नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.
जलतरण तलावात गेल्या चार – पाच महिन्यांमध्ये वारंवार साप आढळत होते. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास तलावात दोन फूलट लांबीचे मगरीचे पिल्लू आढळले. तलाव पोहोण्यासाठी सुरू करण्याआधी त्याची नियमितपणे पाहणी केली असता हे पिल्लू आढळले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. या जलतरण तलावाच्या शेजारी नव्याने सुरू झालेल्या एका प्राणिसंग्रहायलातून हे प्राणी येत असावेत असे सभासदांचे म्हणणे आहे. तसेच मगरीचे पिल्लू आढळल्यानंतर हा संशय बळावला होता. मात्र या प्राणिसंग्रहालयाच्या मालकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप फेटाळून लावला होता. महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले असता ही मगर प्राणीसंग्रहायलायतून आल्याचे निदर्शनास आले.