मुंबई : मुंबईत दोन्ही उपनगरांसह शहरातील अनेक पदपथांची दुरावस्था झाली आहे, तर बहुतांश पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, नागरिकांना चालण्यायोग्य पदपथ उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. मात्र, या समस्येकडे आता महापालिकेने गांभीर्याने पाहायला सुरुवात केली असून लवकरच पदपथांची एकूण स्थिती सुधारण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी महापालिकेने एकात्मिक पदपथ धोरण तयार केले आहे.
याअंतर्गत दिव्यांगांसाठीही अनुकूल पदपथ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबईत पदपथांवरील अतिक्रमणे, उखडलेल्या फरशा, अतिउंची यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे गैरसोयीचे ठरू लागले आहे. पदपथ चालण्यायोग्य नसल्याने अनेकदा नागरिकांना थेट रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अनेकदा यामुळे अपघाताही घडतात. काही वेळा यात जीवितहानी देखील होते. मुंबईतील अनेक पदपथांवर अनधिकृतरित्या छोटी दुकाने, मंदिरे बांधण्यात आली आहेत.
चालण्यायोग्य पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिक रस्त्यांवरून प्रवास करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही होते. मात्र, आता मुंबई शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत असताना पदपथांकडेही लक्ष देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पादचाऱ्यांना नाईलाजाने रस्त्यांवरून चालावे लागू नये, तसेच त्यांना चालण्यासाठी सुरक्षित पदपथ उपलब्ध व्हावेत, या हेतूने लवकरच मुंबईतील पदपथांची डागडुजी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पदपथांची स्थिती, त्यांची रुंदी, सुरक्षितता, वापराची सहजता, नियमित परिरक्षण आदी गोष्टी लक्षात घेऊन चालण्यायोग्य पदपथ तयार केले जाणार आहेत. वापरास अधिक सुलभ, पादचारी व दिव्यांगांसाठी अनुकूल पदपथ तयार करण्यासाठी महापालिकेतर्फे एकात्मिक पदपथ धोरण तयार केले आहे.