मे अखेरपर्यंत पुरेसे पाणी मिळेल
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींजमधील गृहप्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मे अखेरीसपर्यंत बोळींजमधील म्हाडा वसाहतीला पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन वसई – विरार महानगरपालिकेकडून देण्यात आले आहे.
कोकण मंडळाने विरार-बोळींज येथे सर्वात मोठा गृहप्रकल्प राबविला आहे. मात्र येथे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने रहिवाशांची मोठी अडचण होत आहे. याच कारणामुळे २०१६ पासून या प्रकल्पातील उर्वरित घरांची विक्री होऊ शकलेली नाही. तीन वेळा सोडत काढूनही या प्रकल्पातील २,०४८ घरे विकली गेली नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने घरे पडून रहाणे मंडळाला परवडणारे नाही. त्यामुळेच मंडळाने १० मे २०२३ रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत या घरांची ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वाने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विरार – बोळींजमधील २,०४८ घरांच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस १७ मार्चपासून सुरुवात होणार असून ही प्रक्रिया १२ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार आहे.
हेही वाचा >>> स्तनाच्या कर्करोगावर मोफत उपचार करणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणा
विरार-बोळींजमधील घरांची यावेळी विक्री होईल का अशी चिंता कोकण मंडळाला भेडसावत आहे. येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंडळ वसई-विरार महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सातत्याने पाठपुरावा करत आहे. वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीए सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम सुरू असून पहिला टप्पा वसई-विरारसाठी आहे. त्यानुसार आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा मार्च-एप्रिलदरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.
या दाव्याच्याअनुषंगाने आता वसई – विरार महानगरपालिकेनेही मे अखेरीस बोळींज म्हाडा वसाहतीला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल अशी हमी दिली आहे. दरम्यान, २१ डिसेंबर २०२२ मध्ये रहिवासी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची एक बैठक झाली होती. या वसाहतीला मे अखेरीस पुरेसा पाणीपुरवठा करण्यात, येईल असे बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमुद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने इच्छुकांना विरार – बोळींजमधील घरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहेच, पण ही घरे परवडणाऱ्या दरात असून मोक्याच्या ठिकाणी आहेत, असे आवाहन म्हाडाने इच्छुकांना केले आहे. या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल असा दावाही यानिमित्ताने करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> “…म्हणून भाजपा आणि शिंदे गटातील महिला आमदार तणावाखाली”; ठाकरे गटातील आमदाराचं विधान
महानगरपालिकेकडून विरार-बोळींजमधील म्हाडा वसाहतीला जमेल तितका पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र या वसाहतीची गरज अधिक असून ही गरज पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे येथे पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, रहिवाशांना अडचणी येत असून म्हाडाची उर्वरित घरेही विकली जात नाहीत. पण आता लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. एमएमआरडीएचा सूर्या प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यास या वसाहतीलाही पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यानुसार मे अखेरपर्यंत येथील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे. अनिल पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका