लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील झाशीची राणी तलाव परिसरातील इक्सार मेट्रो स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रिज) टाकणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाने कडक कारवाई केली. या प्रकरणाबाबत संबधितांवर नोटीस बजावण्यात आली असून ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पोलिसांतही तक्रार करण्यात आली आहे.
बोरिवली पश्चिम येथील झाशीची राणी तलाव परिसरातील सीटीएस क्रमांक १५४८ या भूखंडावर अनधिकृतपणे राडारोडा टाकण्यात आला असून जमिनीवर भराव करून त्यावर बांधकाम करण्यात येत होते. याबाबतची माहिती पालिकेच्या आर उत्तर विभागाला मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने याप्रकरणी जमिनीच्या मालकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली. पालिकेच्या अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. या भूखंडावर इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याकरीता भूखंडावर कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे राडारोडा टाकला जात होता व हा राडारोडा सपाटीकरण करून जमीन तयार केली जात होती.
आणखी वाचा-अपहरण करून २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
या प्रकरणी पालिका प्रशासनाने एमआरटीपी कायद्यांतर्गत मालकाला नोटीस पाठवली असून एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली. या भूखंडावर आणखी राडोरोडा आणून टाकू नये म्हणून आर मध्य विभाग कार्यालयाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मालकाकडून ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी वाहतूक पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून राडारोडा आणणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करण्याची सूचनाही पालिकेने केली आहे. हा संपूर्ण भूखंड सध्या पालिकेच्या घनकचरा विभागाच्या देखरेखीखाली असल्याची माहिती पालिकेच्या आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली.