मुंबई : ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा’च्या मार्गदर्शक तत्वांनुसार २०३० पर्यत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ३१ जानेवारी ते १५ फेब्रवारी २०२५ दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मुंबईतील ९ लाख ८९ हजार घरांतील अंदाजित ४९ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुष्ठरोग शोध तपासणी मोहिमेअंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत पोहचून नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच नव्याने आढळणाऱ्या कुष्ठरोग रुग्णांसाठी नजीकच्या परिसरातच उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी दिल्या आहेत.

कुष्ठरोग शोध अभियान २०२४-२५ अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कुष्ठरोगविषयक जनजागृती, तपासणी करणार आहे. कुष्ठरोगाच्या नवीन रुग्णांचा शोध घेणार आहेत. या अभियानाकरिता एकूण २ हजार ८०७ चमू तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चमूमध्ये एक महिला आरोग्य स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचा समावेश असेल. या चमूंमार्फत ९ लाख ८९ हजार घरांतील अंदाजित ४९ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानादरम्यान आढळलेल्या नवीन कुष्ठरुग्णांची नोंदणी करण्यात येईल. त्यांना नजिकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रे, दवाखाने येथे मोफत उपचाराकरिता संदर्भित केले जाईल.

कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार असून बहुविध औषधोपचार पद्धतीने कुष्ठरोग बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे एमडीटीचे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. बहुविध औषध (एमडीटी) उपचाराची पाकिटे महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने तसेच ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोग बरा होत असल्याने लक्षणे दिसल्यास घाबरुन न जाता कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या महानगरपालिका, सरकारी रुग्णालयात लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. सर्व नागरिकांनी घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.