लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मालाड पश्चिम परिसरातील मढ मार्वेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी नऊ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मढ मार्वे रस्त्यावरील सुमारे ११३ मीटर लांबीचा भाग मोकळा झाला असून मढ मार्वेला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
मालाड पश्चिमेकडील मार्वे रस्त्यावर मालवणी चर्च आणि आजूबाजूच्या बांधकामांमुळे वाहतूक कोंडी होत होती. मढ मार्वेला जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी पर्यटकांची गर्दी असते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र मालवणी चर्च येथील एक बंगला आणि नऊ दुकाने रस्त्याच्या रुंदीकरणाआड येत होती. या ठिकाणी चर्चच्या फादरचा बंगला आहे. हा बंगला व नऊ दुकानांना महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाने नोटीस पाठवली होती. तसेच ही बांधकामे तोडण्याच्या बदल्यात या दुकानदारांना व चर्चच्या फादरना मोबदला देण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाने दिला होता. दुकानदारांनी महानगरपालिकेचा प्रस्ताव मान्य केला असून त्यामुळे महानगरपालिकेने मंगळवारी ही बांधकामे हटवली. मात्र बंगल्याच्या प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बंगल्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चे चित्रीकरण वेगात सुरू
हा बंगला पुरातन वास्तू असल्याचा दावा चर्चच्या प्रतिनिधींनी केला आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाने पुरातन वास्तू विभागाकडे याबाबत विचारणा केली असता ही वास्तू पुरातन वारसा नसल्याचा निर्वाळा विभागाने दिल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हे प्रकरण न्यायायलात प्रलंबित असून या बंगल्यावर कारवाई करण्यात आली नाही. या कारवाईसाठी दोन जेसीबी, इलेक्ट्रिशिअन, डंपर, पोलीस, अभियंते, १५ कामगार उपस्थित होते.