मुंबई : महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्करोगावरील उपचारांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या प्रतूतिगृह व आरोग्य केंद्रांमध्ये मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये कर्करोगांवरील उपचारांसाठी ‘विभागनिहाय सर्वसमावेशक कर्करोग सेवा मॉडेल’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोग नियंत्रणासाठी प्रत्येक विभागातील प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रामध्ये कर्करोग तपासणी क्लिनिक सेवा महिन्यातून एक किंवा दोन दिवस सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून कर्करोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. देशभरामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार २५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. ६० टक्के महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण अखेरच्या टप्प्यात लक्षात येत असल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. मात्र लवकर निदान झाल्यास ९८ टक्के महिलांचे प्राण वाचविणे शक्य होईल.
गर्भाशयाच्या कर्करोगाने दरवर्षी देशभरात तीन लाखांपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू होतो. यापैकी ८५ टक्के महिला मध्यमवयीन आहेत. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कर्करोगावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच धर्तीवर आता मुंबई महानगरपालिकेनेही आरोग्य केंद्र, आपला दवाखान्यातील ३३ पॉलिक्लिनिक आणि ३० प्रसूतिगृहांमध्ये मुख, स्तन व गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रसूतिगृह व पॉलिक्लिनिकमध्ये या उपक्रमाला करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
सामाजिक संस्थांची मदत घेणार
महिलांमधील कर्करोगाचे निदान वेळेत व्हावे यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला स्तन कर्करोग आणि गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यास पटकन तयार होत नाही. त्यामुळे या महिलांना तपासणी केंद्रापर्यंत आणण्यासाठी कर्करोगासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मॅमोग्राफीद्वारे तपासणी करण्यासाठी महिलांना विशेष कूपन दिले जाणार आहे, ज्यामुळे त्या खासगी केंद्रांमध्ये जाऊनही तपासणी करू शकतील, असेही डॉ. दक्षा शाह यांनी सागितले.