महापालिकेच्या निवडणुकीमुळे निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : मुंबईतील सर्वात जास्त लोक संख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाचे विभाजन या वर्षीही होऊ शकणार नाही. चालू आर्थिक वर्षांत या विभाजनाकरिता पाच कोटींची तरतूद करण्यात आलेली असली तरी या आर्थिक वर्षांत हे विभाजन होऊ शकणार नाही, अशी चिन्हे आहेत. पुढील वर्षी पालिके च्या निवडणुका अपेक्षित असल्यामुळे हे विभाजन पुढे ढकलले जाण्याचीच शक्यता आहे.

मालाड पूर्व आणि पश्चिमेचा समावेश असलेला पी उत्तर हा विभाग मुंबईतील सर्वात जास्त लोकसंख्येचा भाग आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून ते पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला क्रांतीनगर आप्पा पाडा तर दक्षिणेला चिंचोली बंदपर्यंत पसरलेल्या पी उत्तर विभागाचे विभाजन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतो आहे. १८ प्रभाग असलेल्या या भल्यामोठय़ा विभागाला सोयी-सुविधा देताना पालिका यंत्रणेच्याही नाकीनऊ येतात, तर नागरिकांनाही या विभाग कार्यालयापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात या विभागाचे विभाजन करण्याची घोषणा के ली होती. मालाड पूर्वेला ‘पी पूर्व’ तर मालाड पश्चिमेला ‘पी पश्चिम’ असे दोन विभाग करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. तसेच त्यासाठी पाच कोटींची तरतूदही के ली होती. मात्र या वर्षी तरी हे विभाजन होणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.

पी उत्तर विभाग कार्यालय हे मालाड पश्चिमेला असून पूर्वेला आप्पा पाडा, आंबेडकरनगर, क्रांतीनगर, संतोषनगर येथील रहिवाशांना विभाग कार्यालयात यायचे असल्यास पाच-सहा किलोमीटपर्यंत रिक्षाने यावे लागते. त्यांना वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे हे विभाजन लवकर झाल्यास येथील रहिवाशांना दिलासा मिळू शकतो. याबाबत उपायुक्त भारत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विभाजनासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला आहे. मात्र त्यात आणखी काही सूचनांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्याचा पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. मात्र करोनामुळे ही प्रक्रिया रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विभाजन कसे होणार?

या विभाजनामुळे नगरसेवकांच्या प्रभाग रचनेत बदल होणार नाहीत, तर के वळ प्रशासकीय सोयीसाठी काही प्रभाग हे एका विभागातून दुसऱ्या विभागात अंतर्भूत के ले जाणार आहेत. प्रत्येक विभाग (वॉर्ड) हा दहा प्रभागांचा असेल अशी रचना के ली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाच्या आजूबाजूचे जे विभाग आहेत त्यातील काही प्रभागही अन्य विभागात समाविष्ट के ले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे के  पश्चिम किं वा पी दक्षिण या विभागातील प्रभाग दुसऱ्या विभागात जाण्याची शक्यता आहे.

भाजपचा शिवसेनेवर आरोप

विभाजन रखडवण्यामागे सत्ताधारी शिवसेनेचाच हात असल्याचा आरोप भाजपचे मालाडमधील नगरसेवक विनोद मिश्रा यांनी के ला आहे. मालाडमध्ये शिवसेनेचे संख्याबळ कमी असून भाजपचे जास्त आहे. त्यामुळे विभागावर भाजपचे वर्चस्व राहील या भीतीने शिवसेना या विभाजनासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी के ला आहे.

मालाड पी उत्तरची राजकीय स्थिती मालाडमध्ये ३२ ते ४९ असे १८ प्रभाग आहेत. त्यात आठ प्रभाग हे पश्चिममधील आहेत, तर दहा प्रभाग हे पूर्व विभागातील आहेत.

’ पक्षीय बलाबल

शिवसेना    पाच

भाजप  आठ

काँग्रेस चार

अपक्ष   एक

पी उत्तरच्या विभाजनासाठी अभ्यास समिती स्थापन केली आहे. या विभाजनामुळे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय कार्यालयासाठी किती कर्मचारी लागतील, किती प्रशासकीय विभाग लागतील, किती खर्च येईल, याचा आढावा घेण्याची गरज आहे. तसेच त्यानंतर या सगळ्याला पालिका सभागृहाची मंजुरी घ्यावी लागेल.

 – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पश्चिम उपनगर