मुंबई : महानगरपालिका मुख्यालयातील विस्तार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील कार्यलय व दालन नूतनीकरणानंतर उपायुक्त (पायाभूत सुविधा) यांना देण्यात आले होते. उल्हास महाले यांनीही त्याच दालनातून सर्व कामकाज पार पडले. महाले यांच्या निवृत्तीनंतर शशांक भोरे यांची उपायुक्त (पायाभूत सुविधा) पदी नियुक्ती झाली. मात्र, काहीच आठवड्यात त्यांना अन्य दालनात बसण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केला आहे. या घटनेबाबत चर्चा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांना इंजिनीअर्स असोशिएशनने पत्र पाठवले आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने उल्हास महाले यांच्या निवृत्तीनंतरही पुन्हा त्याच पदावर म्हणजेच उपायुक्त (पायाभूत सुविधा ) या पदावर कंत्राटी तत्वावर सामावून घेतले. या कंत्राटी उपायुक्त पदाची नियुक्ती केवळ एका वर्षासाठी होती. त्याचा कालावधी १४ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे १३ मार्च २०२५ रोजी उल्हास महाले यांनी पदभार सोडल्यानंतर शशांक भोरे यांच्याकडे उपायुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. महानगरपालिका मुख्यतातील सहाव्या मजल्यावरील दालनातून महाले यांनी संपूर्ण कारभार सांभाळला. मात्र, शशांक भोरे यांना दालन मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्नात होते.
अखेर शुक्रवारी त्यांना अन्य दालनात बसण्यास भाग पडण्यात आले, असा दावा म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी केला आहे. परिणामी, अभियंता संवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या मुख्यालयात निवृत्त झालेले, तसेच अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांना मोठी दालने देण्यात आली आहेत. मात्र, शशांक भोरे यांना दालन रिकामे करण्यास भाग पाडणे अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. या घटनेचा इंजिनीअर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला असून उपायुक्तांना (पायाभूत सुविधा) सहाव्या मजल्यावरील दालन परत देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.