राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवत तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे, तर कांदिवलीच्या आर.आर.पी. म.न.पा. हिंदी शाळेतील शिवम दिनेश विश्वकर्मा या विद्यार्थ्यांला सतरा वर्षांखालील गटामध्ये सवरेत्कृष्ट मुष्टियोद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे. मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात जिल्हा व विभागीय स्तरावर यश मिळविलेल्या महापालिका शाळांतील अकरा विद्यार्थ्यांनी भंडारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे.

शिवम विश्वकर्मा, अमन यादव, विनय विश्वकर्मा या तीन विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले असून या तिघांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. याचबरोबर सलीम मो. शब्बीर अन्सारी व अनिल मानसिंह या दोन विद्यार्थ्यांना रौप्य, तर गुलफाम मकसुद आलम मन्सुरी, रुपेशकुमार बिंद व दानिश चौधरी यांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, शिक्षणाधिकारी शांभवी जोशी व शारीरिक शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक रामेश्वर लोहे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Story img Loader