संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार केल्यास कारवाई
प्रसाद रावकर
मुंबई : पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सूचना न देता करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. लक्षणे असतानाही रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे येत्या काळात फ्लू किंवा सर्दी, खोकल्याच्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यास खासगी डॉक्टर टाळाटाळ करण्याची चिन्हे आहेत. मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पडली असून हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. एकीकडे करोनाची लाट वेगाने पसरत असताना साध्या तापाचे रुग्णही वाढू लागल्याने गोंधळ निर्माण होऊ लागला आहे. करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनात सर्दी, खोकला आणि ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने याबाबत नागरिकही काहीसे बेफिकीर आहेत. अनेक रुग्ण पालिकेच्या दवाखान्यांत जाऊन चाचणी करण्याऐवजी खासगी डॉक्टरांकडून औषधे घेऊन उपचार करत आहेत. मात्र, यातील संभाव्य करोना रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील तसेच त्यांच्या शेजारी राहणारे नागरिक यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर छोटय़ा नर्सिग होमचे चालक, मालक यांनाही या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. करोनाबाधित रुग्णावर कोणते उपचार करावेत, अशा रुग्णांसाठी कार्यपद्धती काय असावी, आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील खासगी डॉक्टरांना या संदर्भात प्रशिक्षण देण्याच्या सूचना संबंधित पालिका अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. चाचणी सक्तीची लक्षणे असलेला रुग्ण आल्यास त्याला करोना चाचणी करण्याची सक्ती करावी, असे या डॉक्टरांना बजावण्यात येणार आहे. करोनाची चाचणी केल्यानंतर संबंधित रुग्णाची माहिती पालिकेला उपलब्ध होऊ शकणार आहे. खासगी डॉक्टरने करोना चाचणी टाळून लक्षणे असलेल्या एखाद्या रुग्णावर उपचार केल्याचे आढळल्यास संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
चाचणी गरजेची
हवामान बदलामुळे सध्या साधा ताप, सर्दी, खोकल्याची साथ आहेच. मात्र करोनाबाधितांमध्ये हीच लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशी लक्षणे असल्यास करोना चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक मुंबईकर अशी लक्षणे असतानाही चाचणी न करता खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेत आहेत. असे रुग्ण बाधित असल्यास त्यांच्यामुळे अन्य नागरिकांना धोका होऊ शकतो, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
नेमका अंदाज येईना
पालिकेची चाचणी केंद्रे, दवाखाने, रुग्णालये अथवा खासगी प्रयोगशाळांमध्ये करोनाविषयक चाचणी (आरटीपीसीआर) करणाऱ्यांची माहिती आरोग्य विभागाला नित्यनियमाने उपलब्ध होत आहे. मात्र चाचणी टाळून खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या, लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती पालिकेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे बाधितांची नेमकी आकडेवारी आजतागायत स्पष्ट होऊ शकलेली नाही.
खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या करोना संशयित रुग्णांना चाचणी करण्यास भाग पाडावे. अशा रुग्णांची माहिती वेळोवेळी पालिकेला द्यावी. रुग्ण बाधित असल्यास त्याला पालिकेच्या करोना जम्बो केंद्रात पाठवावे. याबाबत खासगी डॉक्टरांची कार्यशाळा आयोजित करून त्यांना अवगत करण्यात आले आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त, मुंबई</p>