मुंबई : पवई येथील जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ तानसा पश्चिम जलवाहिनीची मंगळवारी पहाटे अचानक गळती सुरू झाली. पालिकेच्या जलअभियंता खात्याने आता जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून त्या कामासाठी तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
हेही वाचा…आरबीआय करणार नरिमन पाॅईंट येथील जागेचा विकास, भूखंड आरबीआयला देण्याचा ठराव एमएमआरसीकडून मंजूर
तानसा जलवाहिनीला जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्यानजीक गळती लागल्याचे निदर्शनास येताच महापालिकेने संबंधित जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद केला. तसेच, जलअभियंता खात्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने दुरुस्तीकाम हाती घेतले. दुरुस्ती कामासाठी पवई ते धारावीदरम्यान जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. परिणामी, एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद ठवण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी २४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.