राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या शाळेशेजारी असलेल्या पालिकेच्या भूखंडाचा अवैध वापर होत असतानाही पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक हा भूखंड प्रस्तावित विकास रस्त्यासाठी आरक्षित असल्यामुळे महापालिकेने तो ताब्यात घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याऐवजी या शाळेच्या कॅटरिंग कंत्राटदाराकडून स्वत:च्या फायद्यासाठी या भूखंडाचा वापर केला जात आहे.
हंडोरे यांच्या नालंदा एज्युकेशन फौंडेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेजबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रकाशित केल्यानंतरही पालिकेच्या एम पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखलही घेतली नाही. आपल्या मालकीचा भूखंड ताब्यात घ्यावा, असे स्थानिक पालिका प्रशासनाला वाटू नये याबाबत माजी नगरसेवक राजा चौगुले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणी सहायक आयुक्त श्रीमती नांदेडकर यांचा संपर्क होऊ शकला नाही. तळ व पहिल्या मजल्यावरील हॉलचा लग्न समारंभासाठी वापर करताना या भूखंडाचा पार्किंगसाठी वापर केला जातो. बऱ्याचवेळा लग्नासाठीही या भूखंडाचा वापर केला जातो, असेही काही नागरिकांनी सांगितले. रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या या मोक्याच्या भूखंडाचा वापर सध्या तरी नालंदा एज्युकेशन फौंडेशन करीत आहे. हंडोरे यांनी मात्र आपण या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घेतल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा