मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात विहार तलाव तुडुंब भरून वाहू लागल्यांनंतर लाखो पाणी वाया जाते. अनेकदा अतिवृष्टीमुळे हे पाणी नदी – नाल्यांमधून लगतच्या वस्त्यांमध्येही शिरते. परिणामी, नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पालिका प्रशासनाने वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तलावातून ओसंडून वाहणारे पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी लवकरच विहार उदंचन केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यातही काही प्रमाणात मदत मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिठी नदीचा उगम विहार तलावातून होतो. मुंबईत मिठी नदीच्या काठावर अनेक नागरी वस्त्या आहेत. अनेकदा अतिवृष्टी आणि समुद्राची भरती यामुळे मिठी नदी ओसंडून वाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ काही प्रमाणात कमी होणार आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि भातसा या तलावांतून दररोज ३९०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढू लागली असून शहराची पाण्याची गरजही वाढली आहे. पाण्याची अतिरिक्त गरज भागवण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापही स्थिती ‘जैसे थे’ आहे. विहार तलावाचे ओसंडून वाहणारे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात वळवण्याचा प्रकल्प मुंबईकरांची तहान भागवण्यासाठीही काही प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. या कामासाठी महानगरपालिकेने २०२५ – २६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी जुलै २०२४ मध्येच कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच, त्याबाबत वैधानिक मान्यता प्राप्त करण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे.