लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : दहिसर परिसरात रस्त्याच्या कडेला अशाच सोडून दिलेल्या बेवारस गाड्यांचा पालिकेच्या विभाग कार्यालयातर्फे लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. ५४ दोन चाकी, ३६ रिक्षा, २९ चारचाकी अशा एकूण ११९ वाहनांचा पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयातर्फे लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांपैकी बरीच वाहने क्रमांकविरहीत असून गुन्ह्यांमध्ये वापरलेली असू शकतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या गाड्यांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.

मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबरच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही मोठा आहे. अनेकदा एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या किंवा जुन्या झालेल्या गाड्या सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर सोडून दिल्या जातात. अशा बेवारस वाहनांमुळे रस्त्यावर अतिक्रमण होतेच, पण वाहतूक कोंडीही होते. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू – हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या गाड्या महिनोंमहिने एकाच जागी असल्यामुळे त्या ठिकाणचा कचराही सफाई कामगारांना काढता येत नाही. तसेच अशा वाहनांमध्ये किंवा त्याच्या आडून आणखी गुन्हेही घडू शकतात. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे मुंबई महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार जप्त करण्यात येतात. गेल्या काही महिन्यांत अशाच पद्धतीने जप्त केलेल्या दहिसरमधील वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

याबाबत पालिकेच्या आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, अनेक दिवस एकाच जागी असलेल्या वाहनावर सगळ्यात आधी नोटीस लावली जाते. त्या नोटीशीला वाहनमालकांकडून ठराविक मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास ही बेवारस वाहने जप्त करण्यात येतील. बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव करण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी काही वाहनांची नोंदणी राज्याबाहेर झालेली आहे. तसेच काहींना राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकारी बॅंका यांनी अर्थसहाय्य दिलेले असू शकते. तसेच वाहन ज्याच्या नावे तारण असेल, तसेच गाडी चोरीस गेली असे समजून विमा कंपन्यांनी देयक रक्कम चुकती केली असू शकते. त्यामुळे या वाहनांबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा गहाण असे काही असल्यास त्याबाबत संबंधितांनी संपर्क करावा याकरीता आवाहनही करण्यात आले आहे. याबाबत कोणीही दावा न केल्यास या वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेच्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबतच्या पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipality to auction abandoned vehicles in dahisar mumbai print news mrj