गुजरातचे मत्स्योत्पादन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांच्या वडिलांची १९८४ साली हत्या केल्यानंतर २००२ मध्ये अटकेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. रवी आळवे उर्फ परवेझ शेख (६०) असे त्याचे नाव असून गेली ११ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.
१९८४ साली वधू सोलंकी हे अंधेरीच्या मोगरापाडा येथे राहात होते. त्यांची त्याच भागात राहणाऱ्या चौघांनी हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली होती. परंतु मुख्य आरोपी रवी आळवे पोलिसांना सापडत नव्हता. २००२ मध्ये त्याला अटक झाल्यावर तो जामिनावर सुटला आणि फरार झाला. तेव्हापासून तो पोलिसांना सापडत नव्हता. मुंबई पोलिसांच्या ‘फरारी आरोपी शोध पथका’च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांच्या पथकाने माहिती मिळवून आळवे याला सांताक्रुझ येथून अटक केली.  
आळवे याने आपली ओळख लपविण्यासाठी मुस्लिम महिलेशी लग्न करून मुस्लीम धर्म स्वीकारला होता. त्याने वेषांतर करून परवेझ शेख असे नाव धारण केले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी दिली.