मुंब ईः ग्रॅन्टरोड येथे ३३ वर्षीय महिलेला लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी ५१ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक केली. आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्ताने माखलेले कपडे धुतले. मात्र संशयीत आरोपीच्या चौकशीत गुन्हा उघड झाला.
अलफीया सय्यद (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद नासिर अब्दुल आहत शेख याला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. तो कटेनिया इमारतीत राहतो. अलफीया विनाकारण घराबाहेर फिरत असल्याच्या रागातून त्याने लागडी दांड्याने तिला मारहाण केली. ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तिच्या अंगावरील कपडे व स्वतःच्या अंगावरील कपडे धुतले. पुढे अलफियाला जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यावेळी रुग्णालयाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. शेखवर संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून शेखला अटक केली. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेला लाकडी दांडा हस्तगत केला आहे. याशिवाय आरोपीने मृत महिला व स्वतःचे रक्ताने माखलेले कपडेही पाण्यात भीजत ठेवले होते. न्यायवैधक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.