लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : धारदार शस्त्राने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह दोघांना अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने घरातच धारदार शस्त्राने तिच्या पतीची हत्या केली व परिचीत व्यक्तीच्या मदतीने दुचाकीवरून मृतदेह नेऊन फेकून दिला होता. पण सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलिसांनी तीन तासांत दोघांना अटक करून हत्येच्या गुन्ह्यांची उकल केली. दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची हत्या केल्याचा दावा आरोपी महिलेने केला आहे. पण पोलीस सर्व बाजूंनी याप्रकरणी तपास करत आहेत.
मालवणी येथील गावदेवी मंदिर परिसरातील सोहम कंपाऊंड येथे रविवारी मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे उपायुक्त (परिमंडळ ११) आनंद भोईटे यांनी तात्काळ याप्रकरणी तपास करून आरोपींना पकडण्याचे आदेश मालवणी पोलिसांना दिले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ परिसरातील व्यक्ती व सीसीटीव्हीद्वारे माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी पहाटे दुचाकीवर बसवून मृतदेह तेथे आणण्यात आल्याचे दिसले. दुचाकीवर महिला व एक पुरूष बसला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ते कोठून आले त्याची माहिती घेतली असता गावदेवी मंदिर परिसरातून ते आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता मृत व्यक्तीची ओळख राजेश चव्हाण असल्याचे कळले. राजेश चव्हाण (३०) मालवणी येथील गावदेवी मंदिर परिसरातील अली तलाव गेट क्रमांक ६ येथे रहायचे.
त्यानंतर पोलीस चव्हाण यांच्या घरी पोहोचले असता घरातही रक्ताचे नमुने पोलिसांना सापडले. त्यावरून तेथेच राजेशची हत्या झाल्याचा संशय़ पोलिसांना आला. त्यांनी पत्नी पूजा चव्हाण हिची चौकशी केली असता तिचा हत्येत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या परिचीत व्यक्ती इम्रान मोहम्मद रिझवान (२७) याचाही गुन्ह्यांतील सहभाग स्पष्ट झाला. पुजाने दिलेल्या माहितीनुसार, राजेशला दारूचे व्यसन होते. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याचे सांगितले. तसेच आरोपी रिझवानने मृतेदाची विल्हेवाट लावण्यास पूजाला मदत केल्याचे मान्य केले. हत्येत वापरण्यात आलेल्या धारदार शस्त्राचा शोध सुरू आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आजारी व्यक्ती भासवून मृतदेह नेला
आरोपींनी राजेश चव्हाणच्या मृतदेहाला दुचाकीवर बसवले व त्याच्या अंगावर चादर घालून आजारी व्यक्तीला घेऊन जात असल्याचे भासवले. त्यानंतर सोहम कंपाऊंड येथे मृतदेह फेकून देऊन हत्या घराबाहेर झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पण सीसीटीव्ही चित्रीकरणामुळे हा प्रकार उघड झाला.