मानखुर्दमधील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात तीन दिवसांनी अखेर मानखुर्द पोलिसांना यश आले. चिमुरडीवर अत्याचार करणारा हा नराधम विकृतही असून त्याने भटक्या प्राण्यांवरही अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नराधमाने चिमुरडीचे अपहरण करण्याआधी तिच्या आईशी संवादही साधला होता.
मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या परिसरात चणे-फुटाणे विक्री करणाऱ्या एका महिलेची चार वर्षांची मुलगी रविवार ६ मार्चच्या रात्री हरवली होती. मानखुर्द पोलिसांनी या चिमुरडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, दुसऱ्याच दिवशी सकाळी या मुलीचा मृतदेह मानखुर्दच्या मंडाळा भागात सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते. त्यानंतर, या चिमुरडीची हत्या करणाऱ्या नराधमाचा शोध मानखुर्द पोलीस करत होते. परंतु, तीन दिवस उलटूनही त्यात काही यश आले नव्हते. दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीच्या आईची चौकशी केली असता, मुलगी हरविल्याच्या काही वेळ आधी एका तरुणाने येऊन आईशी संवाद साधल्याचे स्पष्ट झाले. या तरुणाने येऊन तुमची मुलगी खूप सुंदर आहे, मला तिला नेऊन चॉकलेट द्यायचे आहे, असेही म्हटले होते. त्यानंतरच काहीवेळात मुलीचा हात सुटला. आईने दिलेल्या या माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयित तरुणाचे रेखाचित्र तयार केले होते. त्यानुसार परिसरात शोध घेत असताना महाराष्ट्र नगर येथून सचिन पंचारे (२४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Story img Loader