अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे असतानाच आता ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले आहे. राज ठाकरे यांच्या पत्रावर पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज या मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापुर्वीच भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही राज ठाकरेंच्या या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे उमेदवार असलेल्या पटेल यांना ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना या विषयासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “ते (पत्र) मी बघितलेलं नाही. मी सकाळपासून प्रचारात होतो. आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतील. मी बोलणं बरोबर ठरणार नाही,” अशी पहिली प्रतिक्रिया पटेल यांनी नोंदवली आहे. तसेच पुढे पटेल यांनी, “मी अंधेरीचा एक छोटा कार्यकर्ता आहे. अंधेरीमध्येच काम करतो. वरच्या लेव्हलला काय सुरु आहे मला माहिती नाही,” असंही म्हटलं आहे. याशिवाय पटेल यांनी या निवडणुकीसाठी भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आठवलेंची आरपीआय या तिन्ही पक्षांची युती असून ती भक्कम आहे, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपाने सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते. अंधेरीत शिवसेनेचा विजय झाल्यास त्याचा आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिवसेनेचे नैतिक बळ तर वाढेलच पण मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. भाजपाले हे टाळायचे आहे. अंधेरीत यशाबद्दल भाजपाचे नेते साशंकच आहेत. यामुळेच अंधेरीबाबत भाजपामध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murji patel reacts on raj thackeray letter of request to withdraw candidate in andheri east assembly scsg
Show comments