‘आताच चर्चा कशाला’, असा सूर लावत मुद्दय़ाला बगल देणाऱ्या महायुतीच्या गोटात मुख्यमंत्रीपदाची चर्चा जोरात सुरू झालीच आहे. हे पद भाजपकडे आले, तर पक्षाचे संसदीय मंडळच राज्याचा मुख्यमंत्री ठरवेल असे सांगत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नांना हलकासा धक्का दिला आहे, तर ‘मी मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसेैनिकांची इच्छा आहे’, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या स्पर्धेत थेट उडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड यशानंतर, ‘केंद्रात नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेन्द्र’ अशी घोषणा जन्माला आल्याने, महायुतीच्या भावी मुख्यमंत्र्यांची चर्चेतील नावे अचानक मागे पडलेली असताना ही चर्चा नव्या वळणावर आली आहे.  
मी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा – उद्धव
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रेम वाटय़ाला येणे ही भाग्याची गोष्ट आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची याच प्रेमापोटी इच्छा आहे, असे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही दाखल झाले.  
काहीजणांना स्वतला मुख्यमंत्रीपद हवे असते. पण मला मुख्यमंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, हे त्यांचे माझ्यावरचे प्रेम आहे. निवडणुकांवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सूचकपणे सांगितले. दिल्लीत नरेंद्र व राज्यात देवेंद्र अशी विभागणी होणार का, या प्रश्नाला ‘वेळ आल्यावर याचे उत्तर मिळेल’, असे त्यांनी हसत सांगितले. दिल्लीतील सरकारवर आम्ही नाराज नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वेगाने कामे सुरू केली आहेत, त्यात आमचाही सहभाग असावा व त्यासाठी थेट लोकांशी संपर्क असलेले खाते मिळावे, अशी आमची इच्छा आहे. याबाबत मोदी यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाल्यावरच गीते यांना कार्यभार स्वीकारला, असे उद्धव म्हणाले.
नेतृत्व मुंडेंचे; पण मुख्यमंत्री दिल्लीत ठरेल- तावडे
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर ‘केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेन्द्र’ अशी चर्चा सुरू झाली असली तरी विधानसभेच्या आगामी निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जातील असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, विधिमंडळ पक्षाचा नेता मात्र दिल्लीत संसदीय मंडळाकडून निवडला जाईल, असे सांगत त्यांनी मुंडेंच्या मनोरथांत खोडाही घातला.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतरचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना महायुतीसच विजय मिळणार यात कोणतीच शंका नसून मुख्यमंत्रीही महायुतीचाच होणार हेही निश्चित आहे. महायुतीमधील ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक असेल त्याचा मुख्यमंत्री हा आतापर्यंतचा संकेत असून याहून अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या मुद्दय़ावर सेना-भाजप महायुतीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. तथापि, मुख्यमंत्री निवडीबाबतचे सर्व पर्याय चर्चेतूनच स्पष्ट होतील, असे तावडे म्हणाले.