१९ दिग्गज कलाकारांचा सहभाग; सलग १९ तास कार्यक्रम चालणार; तब्बल १९ राग आळवले जाणार
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट, षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमाने २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात एका आगळ्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सलग १९ तास चालणाऱ्या या आठ ‘प्रहर’राग मैफलीत शास्त्रीय संगीतातील १९ दिग्गज कलाकार सहभागी होणार असून मैफलीत तब्बल १९ राग आळवले जाणार आहेत.
आर्ट अॅण्ड आर्टिस्टच्या संस्थापिका आणि संचालिका दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यासह हरिप्रसाद चौरसिया, एन. राजम, उल्हास कशाळकर, रशीद खान, राजन व साजन मिश्रा, जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित आणि अन्य ज्येष्ठ कलावंत सहभागी होणार आहेत.
दुर्मीळ आणि अभावानेच ऐकले जातात, असे राग या मैफलीत सादर केले जाणार असून विविध तालवाद्यांचेही सादरीकरण या वेळी होणार आहे. यात बासरी, व्हायोलिन, संतूर, सारंगी, सतार, सरोद, महाविणा आदींचा समावेश आहे.
पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने सकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार मध्यरात्री दीड वाजता गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायनाने प्रहर राग मैफलीची सांगता होणार आहे.
भारतीय संगीताचा वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी या तीन संस्थांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम एक स्तुत्य पाऊल असल्याचे पं. चौरसिया यांनी सांगितले.
श्री षण्मुखानंद फाइन आर्ट्स व संगीत सभेचे उपाध्यक्ष व्ही. एस. अमरनाथ सुरी म्हणाले, दिवस आणि रात्रीच्या विविध प्रहरांशी संबंधित राग या वेळी सादर केले जाणार आहेत.
तर त्या त्या प्रहरानुसार राम गायले गेले तर त्यांचा आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, जीवनप्रसन्न होते, असे किशोरी आमोणकर यांनी सांगितले.
‘पंचम निषाद’चे शशी व्यास आणि कार्यक्रमाच्या संकल्पनाकार दुर्गा जसराज यांनी सांगितले, भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘प्रहरा’नुसार राग याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध पैलू उलगडले जावेत, भारतीय शास्त्रीय संगीत व या प्रहर रागांचे जतन, संवर्धन करण्याचा मुख्य उद्देश या मैफलीमागे आहे.